अजित पवार महायुती सोडून महाविकास आघाडीत येतील; संजय राऊतांचा दावा

मुंबई | महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांनी एकत्र येत निवडणुका लढवल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. तसेच भविष्यात एकाच चिन्हावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरू असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार पुढेही महाविकास आघाडीत राहतील का, असा प्रश्न शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर बोलताना राऊत यांनी महत्त्वाचे विधान करत भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र दिसतील, असा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले, माझा ठाम विचार आहे की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. कारण शरद पवार आमच्याबरोबर आहेत आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे. अजित पवार सध्या महायुतीत असले तरी त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाट लावलेला आहे. त्यामुळे तिथे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मला खात्री आहे की भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्रितपणे महाविकास आघाडीत दिसतील.
हेही वाचा : “तीन वर्ष तारीख पे तारीख!” सरन्यायाधीश यांच्या शिंदेंबरोबरच्या फोटोवर संजय राऊतांचा टोला
अजित पवार सरकारमधून बाहेर पडतील? असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांना काहीतरी सोडावे लागेल आणि काहीतरी स्वीकारावे लागेल, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल, ते दोन दगडांवर पाय ठेवू शकत नाहीत. आगामी काळात शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
आता सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे मेले मेंढरू आगीला भीत नाही. स्वतः पंतप्रधानांनी त्यांच्या घोटाळ्याची माहिती देत गर्जना केली, तरीही ते सरकारमध्ये आहेत. आता कोणत्या तोंडाने ते अजित पवार यांची फाईल ओपन करणार आहेत. त्या फाईलमध्ये काही आहे की नुसत्याच तो पोकळ डरकाळ्या फोडत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.




