‘हल्लेखोर बिनधास्त फिरत होते, पोलीस फक्त बघत होते’; संदीप श्रीरसागर यांचा गंभीर आरोप
![Sandeep Srirasagar said that the attackers were walking around unchallenged, the police were just watching](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sandeep-Kshirsagar-780x470.jpg)
नागपूर : बीडमध्ये झालेल्या जाळपोळ घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप श्रीरसागर यांनी गंभीर आरोप केला आहे. जाळपोळीच्या घटना घडल्यावर मी बीडमध्ये नव्हतो. मी पाच ते दहावेळा पोलिसांशी संपर्क साधला. पण, कुठल्याही प्रकारची कारवाई सात ते आठ तासांच्या कालावधीत झाली नाही, असा आरोप संदीप श्रीरसागर यांनी केला आहे. ते विधानसभेत बोलत होते.
संदीप श्रीरसागर म्हणाले, मराठा आरक्षणाला बीडमधील आमदारांनी आणि माझ्या मतदारसंघातील समाज बांधवांनी दिली. जाळपोळीच्या घटना घडल्यावर मी बीडमध्ये नव्हतो. कुणाचं दुकानं आणि घर जळतंय मला कार्यकर्त्यांचे फोन येत होते. हे लोन माझ्या घरापर्यंत आलं. मी पाच ते दहावेळा पोलिसांशी संपर्क साधला. पण, कुठल्याही प्रकारची कारवाई सात ते आठ तासांच्या कालावधीत झाली नाही.
दुकानं, पक्षांची कार्यालय फोडून जाळण्यात आली. समाजकंटकांनी नियोजन आखून माझ्या घराची लाईट आणि पाण्याची पाईप तोडली. याचे सीसीटीव्ही व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हा प्रकार होत असताना पोलिसांची गाडी माझ्या घराबाहेर तैनात होती. पण, समाजकंटक आल्यानंतर पोलिसांची गाडी बाजूला गेली, असं संदीप श्रीरसागर म्हणाले.
हेही वाचा – पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपा नेत्याचं मोठं विधान
माझा घराचा रस्ता ओलांडल्यानंतर पोलीस मुख्यालय आहे. तिथे आरक्षित केलेले पोलीस असतात. दंगल पथक तिथे उपलब्ध असते. पण, हा प्रकार झाल्यानंतर पोलीस गाडी निघून जाते. एफआयरमध्ये सांगण्यात आलं, ‘घटना घडल्यानंतर अश्रूधुराच्या कांड्या आणि रबरी गोळ्या मारण्यात आल्याचं म्हटलं गेलं.’ पण, सीसीटीव्हीत असा कुठलाही प्रकार झाल्याचं दिसत नाही. पूर्ण एक तास माझा घर जळत होते. माझा कुटुंब घरातच होते. लहान मुलगा मला सतत फोन करून लवकर या म्हणत होता, असं संदीप श्रीरसागर म्हणाले.
पोलिसांना मी सतत फोन केले. मात्र, साधा पोलीस सायरनही वाजवण्यात आला नाही. सगळं घर जळाल्यानंतर माझ कुटुंब कसेबसे वाचलं आहे. हे सगळं नियोजन करून करण्यात आलं होतं. हा जमाव सात ते आठ तास शहरात चालत फिरत होता. पोलीस प्रशासन या जमावाबरोबर फिरत होता. एखादं ऑफिस जाळल्यानंतर जमाव एकमेकांना फोन करून इकडं काम झालंय, पुढील क्रमाकांवर चला असं सांगत होता. सर्व घटनांना क्रमांक देण्यात आले होते. जमावातील अनेकांच्या अंगावर बॅगा होता. पेट्रोल आणि फॉस्परस बॉम्बचा वापर करण्यात आला, असंही संदीप श्रीरसागर म्हणाले.