तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात का? आदित्य ठाकरेंच्या टीकेला मनसे नेत्याचं प्रत्युत्तर
![Sandeep Deshpande said, "Are you Donald Trump?"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Sandeep-Deshpande-and-Aditya-Thackeray-780x470.jpg)
मुंबई | मनसे हा पक्ष पाच वर्ष झोपा काढतो आणि निवडणुकीच्या वेळी जागा होतो, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच, मला वाटतं की मनसे जो बायडेन यांना उमेदवारी देते की काय? असा टोलाही आदित्य ठाकरेंना यावेळी लगावला. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, आदित्य ठाकरे यांना आता साडेचार वर्षांनंतर जाग आली आहे. ते आता मतदारसंघातील विषयांसंदर्भात बैठका घेत आहेत. आजही त्यांनी माढाच्या कार्यालयात बैठक घेतली. मात्र, मागच्या साडेचार वर्षात त्यांना महापालिकेत एकही बैठक घेता आली नाही. मुळात आता आदित्य ठाकरे यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते बैठका घेत आहेत.
हेही वाचा – ‘आठवलेंचा पक्ष हाच खरा आंबेडकरवादी पक्ष म्हणालो तर’; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर
आदित्य ठाकरे म्हणतात की, मनसेने वरळीतून जो बायडेन यांना उमेदवारी दिली की काय, असं त्यांना वाटलं पण तुमच्या समोर जो बायडेन उभे राहायला तुम्ही डोनाल्ड ट्रम्प आहात का? खरं तर आदित्य ठाकरे आज-काल काहीही बोलत आहेत. कारण त्याच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मनसे पाच वर्षानंतर झोपेतून उठलेला पक्ष आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात. मग महाराष्ट्र पिंजून काढतात. हा एक सुपारीबाज पक्ष आहे. ते त्यांचं काम करतील. आम्ही आमचं जनतेच्या सेवेचं काम करत आहोत. गेल्या पाच वर्षांच्या काळात मनसे हा पक्ष कुठेही दिसला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. सुपारीबाज पक्ष आहे तो तिथेच राहिल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. वरळीतून मनसे नेते संदिप देशपांडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत विचारलं असता, मला वाटलं बायडन येत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.