जयंत पाटलांविरोधात बंडखोरीचे वारे! युवा आमदार थेट शरद पवारांकडे नाराजी मांडणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये अंतर्गत धुसफूस चिघळली असून पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविरोधात पक्षातील युवा आमदार एकवटले आहेत. संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये पक्षपातीपणा केल्याचा आरोप पाटील यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तरुण आमदार आणि कार्यकर्ते नाराज असून आपली तक्रार थेट शरद पवारांकडे मांडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी पक्षातील महत्त्वाच्या पदांवर केवळ आपले निकटवर्तीय नियुक्त करत इतर निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले आहे. त्यामुळे पक्षात असंतोष वाढत आहे. विशेषतः तरुण आमदारांमध्ये ही नाराजी अधिक तीव्र आहे.
सध्या वाढत्या नाराजीचा विचार करून शरद पवारांच्या निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते. नाराजीचा तोडगा काढण्यासाठी अंतर्गत संवादाचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – Hagawane Case: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक; तपासाला गती
पक्षाचा वर्धापन दिन 10 जूनला असून त्याआधीच काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यात काही नवीन नियुक्त्या, जबाबदाऱ्या पुनर्वाटप यांचा समावेश असू शकतो.
दरम्यान, अजित पवार गटातही संभाव्य विलिनीकरणावरून मतभेद उफाळून आले आहेत. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे विलिनीकरणास विरोध करणाऱ्या गटात असून त्यांना केंद्रातील संभाव्य मंत्रीपदाची चर्चा देखील गाजत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या अंतर्गत तणाव आणि राजकीय चलबिचल वाढली असून पुढील काही दिवसांत पक्षाच्या रचना आणि नेतृत्वात मोठा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जयंत पाटलांविरोधातील वाढती नाराजी आणि अजित पवार गटातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आणू शकतात.