‘शरद पवारांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत सगळे आमच्या पंगतीत जेवून गेले’; भाजप नेत्याचं विधान चर्चेत
![Raosaheb Danve said that everyone from Sharad Pawar to Mamata Banerjee has eaten in our ranks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sharad-Pawar-and-Mamata-Banerjee-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी धक्कादायक निकाल समोर आला. अनेक जागांवर भाजपचे उमेदवार पराभूत झाले. जालन्याचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच ४०० पारच्या घोषणेमुळे भाजपाचे नुकसान झालं, या दाव्यावरही त्यांनी भाष्य केलं.
रावसाहेब दानवे म्हणाले, अजित पवार यांना भाजपाबरोबर यायचं होतं. एखादा पक्ष किंवा एखाद्या गटाला भाजपा मदत करू इच्छित असेल, तर यात गैर काहीही नाही. राष्ट्रवादीने यापूर्वीही भाजपाबरोबर युती केली होती. १९८५ मध्ये स्वत: शरद पवार माझ्या प्रचाराला आले होते. खरं तर ज्या लोकांनी आमच्यावर आरोप केले ते सर्व पक्ष कधीकाळी भाजपाबरोबर होते. ते आमच्याच पंगतीत जेवून गेले आणि त्यांना वाढायलाही मीच होतो.
हेही वाचा – उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?
फारुख अब्दुल्ला आमच्यावर जातीवादाचे आरोप करतात, मात्र, त्यांचे पूत्र ओमर अब्दुल्ला हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मायावती आमच्यावर आरोप करतात, पण त्या आमच्या पाठिंब्यामुळे दोन वेळा मुख्यमंत्री होत्या. ममता बॅनर्जी आमच्यावर आरोप करतात, पण त्या आमच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या. शरद पवार आमच्यावर आरोप करतात, पण ते १९८५ ला आमच्या बरोबर होतो. त्यांनी स्वत: माझा प्रचार केला. त्यामुळे आज जे विरोधात आहेत, त्यापैकी जवळपास सगळे नेते आमच्या पंगतीत जेऊन गेले. त्यावेळी वाढायला मीच होतो, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
४०० पारच्या घोषणेमुळे भाजपाला नुकसान झालं, यावरून दानवे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत एक नारा दिला जातो. कधी त्याचा फायदा होतो तर कधी त्याचे नुकसानही होते. अबकी बार चारसो पार हा नारा देणं काही चुकीचं नव्हतं. पण विरोधकांनी त्यावरून गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न केला, तोच चुकीचा होता. ४०० जागा मिळाल्या तर मोदी संविधान बदलतील असा गैरसमज पसरण्यात आला. मात्र, हे कधीही शक्य नाही. संविधानाचा ढाचा बदलता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानेही म्हटलं आहे. उलट ज्यावेळी पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले, तेव्हा त्यांनी संविधानावर डोकं टेकवलं, असं ते म्हणाले.