‘प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, मंत्रीपद सोडतो’; रामदास आठवलेंची खुली ऑफर
विधानसभेला महायुतीकडे आरपीआयसाठी १८ जागा मागणार - रामदास आठवले

Ramdas Athawale | रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना एनडीएत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांसाठी रामदास आठवलेंनी केंद्रीय मंत्रीपद सोडण्याची तयारी देखील दर्शवली आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
रामदास आठवले म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. वंचितने महायुतीत (एनडीए) येणं आवश्यक आहे, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल. ते आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा अशी मागणी मी स्वतः करेन.
हेही वाचा – ‘मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे रात्रीस खेळ चाले’; अमित ठाकरेंची टीका
एक राष्ट्र एक निवडणुक याबाबत विचारलं असता ते म्हणाले, पूर्वी वन नेशन वन इलेक्शन अशी प्रणाली होती. संविधानात अशी तरतूद होती. सुरुवातीला काही निवडणूका अशाच झाल्या आहेत. त्यामुळे देशाचा फायदा होणार आहे, हा काही हुकूमशाही आणण्याचा विषय नाही. या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठींबा आहे.
विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे १० ते १२ जागा मागणार आहोत, असं रामदास आठवले यावेळी सांगितलं. ते म्हणाले, विधानसभेला आम्हाला भाजपाच्या कोट्यातून १० ते १२ जागा मिळाव्यात आणि सरकार आलं तर आम्हाला १ ते २ मंत्रिपदे मिळावित, महामंडळं मिळावित अशी अपेक्षा आहे. विधानसभेत आरपीआयचा विचार करावा, आम्हाला डावलू नये, याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आम्हाला भाजपाच्या कोट्यातील समजू नये, तिघांनी मिळून जागा द्यावात. २३ सप्टेंबर रोजी आमचं शिष्टमंडळ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहे. त्यावेळी आम्ही १८ जागांची मागणी करणार आहोत. त्यापैकी किमान १० ते १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.





