राज ठाकरे यांची पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा
येत्या १० तारखेला सभा, निवडणुकीसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
![Raj Thackeray's public meeting for Mahayutti's candidate Muralidhar Mohol in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Raj-Thakre-Murlidhar-Mohol-780x470.jpg)
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारांचा धडाका सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे यांना विनंती केल्यानंतर त्यांची कणकवली येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत राणेंना निवडून आणण्याचं जाहीर आव्हान देखील केलं होतं. अशातच आता राज ठाकरे यांची पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा होत आहे.
पुण्यात महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते आमदार रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यातच राज ठाकरेंची साथ सोडत वंचितकडून वसंत मोरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. अशातच मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे यांची येत्या दहा तारखेला पुण्यातील नदीपात्रात सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, याआधी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेस कोर्स वरती भव्य अशी सभा पार पडली. यावेळी पुणेकरांनी मोदींच्या सभेला भरभरून प्रतिसाद दिला. अशातच आता मोहाळांसाठी राज ठाकरे पुण्यात येत आहेत. त्यामुळे पुणेकर राज ठाकरेंच्या सभेला किती प्रतिसाद देणार. ते ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . तर विरोधकांवर राज ठाकरे कशा पद्धतीने हल्लाबोल करणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.