तुमची पिळवणूक करणाऱ्यांना का निवडून देता? राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल
![Raj Thackeray said why do you elect those who exploit you](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/raj-thackeray-3-1-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नाशिकमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावेळी अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येता आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता? असा सवाल राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना केला.
राज ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी शेतकऱ्यांनी संप केला होता. तेव्हा केही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं, अडचणींच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदानाच्या वेळी मतदान त्यांना करता. त्यावेळी मला शेतकरी बांधव म्हणाले साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं. जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येतो? ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करतो त्यांना तुम्ही मतदान केलंत की नाही? आपण काय करतो आहोत त्याचं भान ठेवा.
हेही वाचा – आषाढी वारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची पालखीमार्ग व पालखीतळांना भेट
निवडणुकीच्या काळात पैसे घेऊन बाकी सगळ्या गोष्टी घेऊन कुणाला मतदान करता? मग पाच वर्षे त्यांच्या नावाने टाहो फोडता आणि परत निवडणुका आल्यावर त्यांनाच मतदान करता. मग कशासाठी हा खेळ खळतो आहोत? मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटतो. मात्र काय करतो आहोत त्याचं भान ठेवा. कारण तुम्ही मतदान त्यांना करता त्यामुळे त्यांना वाटतं की हे मतदान आपल्यालाच करणार आहेत. त्यांना काही फरकच पडत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.