निवडणूक आयोग ५ वर्ष झोपा काढतो का? राज ठाकरेंचा परखड सवाल
![Raj Thackeray said whether the Election Commission sleeps for 5 years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Raj-Thackeray-4-780x470.jpg)
मुंबई | शारदाश्रय शाळेच्या काही पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पहिली ते चौथीच्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पालिका, निवडणूक आयोग आणि सरकारने बोलावलं आहे. या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडलं आहे. निवडणूक आयोग ५ वर्ष झोपा काढतो का? असा परखड सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुंबईतील ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढले आहेत, मग शाळेतील मुलांना शिकवणार कोण? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतो? घाईगडबतीत सर्व काम करुन शाळेवर दडपण का आणत आहेत? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितले आहे, रुजू व्हा. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की, तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, असं ते म्हणाले.
हेही वाचा – मविआतील दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले..
निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येत नाही. निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो? निवडणूक आयोग ५ वर्ष झोपा काढतो का? तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का? किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. प्रत्येकवेळा नवं काहीतरी आणायचं आणि वाद ओढावून घ्यायचा. शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवायला आले आहेत. पण यात विद्यार्थ्यांची चूक काय आहे. शिक्षकांनी कुठेही रुजू होऊ नये. विद्यार्थ्यांना घडवणं त्यांचं काम आहे, निवडणुकीची तयारी करणं त्यांचं काम नाही. शिक्षकांवर कोण शिस्तभंगाची कारवाई करतेय. ते मला पाहयाचं आहे. लवकरच निवडणूक आयोगासोबत लवकरच बैठक होईल, असं राज ठाकरे म्हणाले.