एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले..

Raj Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या राज्यव्यापी दौरा करत आहेत. विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांबाबत आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राची आजची जी स्थिती आहे, ती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती, असं ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, मागच्या पाच वर्षात राज्यात ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला, त्याला लोक कंटाळलेले आहेत. लोकसभेला ४०० पारची घोषणा आणि संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे मुस्लीम आणि दलित समाजाने एकगठ्ठा मतदान केले. हे मतदान अँटी मोदी आणि अँटी शाह असे होते. ते काही उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी मतदान नव्हते. ती वाफ आता निघून गेली आहे. त्यामुळे विधानसभेला गोष्ट वेगळी आहे. कारण पाच वर्षांपूर्वी मतदारांबरोबर जी प्रतारणा झाली, ते लोक विसरलेले नाहीत. या गोष्टीचा राग विधानसभेच्या निवडणुकीला नक्की काढतील. हे मला दौऱ्याच्या माध्यमातून दिसत आहे.
हेही वाचा – आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनानं दुचाकीला उडवलं, दोघांचा मृत्यू
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, वरळी विधानसभेत आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. मागच्यावेळी आम्ही निवडणूक लढवली नाही. मात्र यावेळी आम्ही वरळी विधानसभेत उमेदवार देणार आहोत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देऊ, असे त्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या याबाबत पक्ष पातळीवर सर्व्हे सुरू आहे. २००९ साली आम्ही सव्वा दोनशे जागांवर निवडणूक लढविली होती. यावेळीही किमान तेवढ्याच जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.





