‘पुण्याचे पालकमंत्री येथे नसतानाही धरण वाहिलं’; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला
![Raj Thackeray said that the dam was built even when the Guardian Minister of Pune was not here](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Raj-Thackeray-1-780x470.jpg)
पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी करत नुकसानीचा आढाला घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाणार याची कल्पनाही लोकांना नव्हती. याला काय सरकार चालवणं म्हणतात का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच, पुण्याचे पालकमंत्री येथे नसतानाही पुण्यात धरण वाहिलं, असा टोलाही लगावला.
राज ठाकरे म्हणाले, धरणातील पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडलं जाणार याची कल्पनाही लोकांना नव्हती. त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं. मला वाटतं की राज्य सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. मात्र, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. गेले अनेक वर्षे हे मी सांगतो आहे. त्याचच हे चित्र आहे. प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून डेव्हलमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट नसते.
हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका’; बच्चू कडूंचं विधान
शहरात किती गाड्या येत आहेत. किती विद्यार्थी येत आहेत. येणाऱ्या गाड्या पार्क कुठे होणार? लोक राहणार कुठे? या प्लॅनिंगसाठी काही उपायोजना कराव्या लागतात. मात्र, आपल्या कोणत्याही शहरात या उपायोजना राबवल्या जात नाहीत. आपल्याकडे जमीन दिसली की विकायची एवढाच उद्योग सुरू आहे. महानगर पालिकेतील काही अधिकारी आणि राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर्स यांच्यामाध्यमातून अशी शहर बरबाद होत जात आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
गेल्या दोन ते तीन वर्षे केंद्र सरकार महानगर पालिकांच्या निवडणुका घेत नाही. येथे कोणीही नगरसेवक नाही. विधानसभा निवडणुका लागतील तेव्हा आमदार येतील. मग नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी कोण घेणार? मग प्रशासनाशी कोणी बोलायचं? याची सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यांनीही लोकांना धीर दिला पाहिजे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांना तुम्ही फुकटची घर देत आहात. पण या राज्यातील लोक आहेत ते भीक मागत आहेत. मग याला काय सरकार चालवणं म्हणतात का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.