हिंदी सक्तीविरोधात ६ जुलैला मोर्चा काढणार; राज ठाकरे यांची घोषणा

मुंबई | हिंदी सक्तीच्या विरोधानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (दि. २६ जून) राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान ही भेट झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपण सरकारची भूमिका फेटाळली असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून ६ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. गिरगाव ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढला जाणार आहे.
राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता माझ्याकडे येऊन गेले. त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची संपूर्ण भूमिका मी फेटाळून लावली आणि आम्हाला ती मान्य नाही असं सांगितलं. त्यांनी हेही मान्य केलं की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टीचा समावेश नाही आणि हे राज्यावरती टाकलेली गोष्ट आहे. हे राज्याकडे सोपवलेलं असताना ते हे का करत आहेत? हे अजून अनाकलनीय आहे.
हेही वाचा : घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, सावध राहण्याचा काळ; शरद पवार यांचा इशारा
मी त्यांना सांगितलं की सीबीएससी शाळा ज्या नव्याने आल्या आहेत त्या आयएएस अधिकार्यांच्या मुलांसाठी त्या शाळा काढण्यात आल्या होत्या. आता त्या शाळांचे वर्चस्व राज्यांच्या शाळांवरती करण्याचा प्रयत्न आहे. तोच केंद्रातला आणि आयएएस अधिकाऱ्यांचा तो अजेंडा आहे. महाराष्ट्र हे का आणि कशासाठी करण्याचा प्रयत्न करतोय, जे बाकीची राज्य करण्याचा प्रयत्न देखील करत नाहीयेत. काही गोष्टींची त्यांच्याकडे उत्तरे नव्हती आणि ते तेच-तेच बोलत होते, असं राज ठाकरे म्हणाले.
या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार. हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना मी आवाहन करतोय, येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. संपूर्ण मोर्चा मराठी माणसाचा असेल, मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल, असंही राज ठाकरे म्हणाले.





