घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, सावध राहण्याचा काळ; शरद पवार यांचा इशारा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. घोषित आणि अघोषित आणीबाणी यात फरक असतो. हा फरक काय आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पुन्हा सगळ्यांना सावध राहण्याचा काळ आला आहे, असं परखड मत त्यांनी मांडलं. संसदीय लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
शरद पवार म्हणाले, की वृत्तपत्रात जे काम करतात त्यांना माहीत असेल. बाकीच्यांना माहिती नाही. जी वृत्तपत्रं त्यांचं स्वच्छ मत मांडतात ते सरकारच्या विरोधात असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात. ही बातमी छापू नका. सरकार विरोधी भूमिका घ्यायची असेल आणि बातमी लावायची असेल तर नंतर काही झालं तर आमच्याकडे येऊ नका. हे सांगत एक प्रकारे धमकीच दिली जाते.
घोषित आणि अघोषित आणीबाणी यात फरक करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. पुन्हा सगळ्यांना सावध राहण्याचा काळ आला आहे. संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील हा दृष्टीकोन घेऊनच पुढे उभे राहू, त्यासाठी वाट्टेल ती किंमत देऊ. एवढंच नाही तर आणीबाणी जरी इंदिरा गांधींनी लावली होती तरीही पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली होती ही गोष्ट विसरता कामा नये. नंतरच्या काळात जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली होती आणि चित्र बदललं होतं, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.