‘सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटू नये’; राज ठाकरे यांचं वक्तव्य
![India, Myanmar, Thailand, Highways, 70 percent work completed, Union Minister, Gadkari's information,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/raj-Thackeray-7-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या सहमतीनेच अजित पवार यांनी हे बंड केले आहे, मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.
राज ठाकरे म्हणाले की, कोणालाही मतदारांशी काही देणं घेणं नाही. पक्षाचे कट्टर मतदार होते, याचा सर्वाना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल त्या तडजोडी करायचं हे पेव फुटलं आहे. मला वाटतं लोकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याचा गरज आहे. लवकरच मेळावा घेणार आहे. तसेच, महाराष्ट्र दौराही सुरु करणार आहे. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शरद पवार सांगत असले तरी.
हेही वाचा – उद्धव ठाकरे ‘अकेला चलो’चा नारा देणार? ठाकरे गटातील नेत्याची माहिती
दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे पाठवल्याशिवाय जाणार नाही. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. याची सुरुवात पहाटेच्या शपथविधीनंतर झाली. शत्रू कोण मित्र कोण कळत नाही. लवकरच माझा महाराष्ट्र दौरा सुरू होणार, लोकांसमोर मी माझी भूमिका मांडणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.