ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची प्राथमिक चौकशी सुरू

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची प्राथमिक चौकशी सुरु केल्याची माहिती गुरुवारी पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. सरकारी वकील अरुणा पै यांनी न्या. धीरज सिंग यांच्या खंडपीठाला ही माहिती दिली. आर्थिक गुन्हेने शाखेने ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी सुरु केली आहे, असे अॅड. पै यांनी न्यायालयाला सांगितले.
याप्रकरणी गौरी भिडे यांनी याचिका केली आहे. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य ठाकरे यांनी ते काय काम करतात. त्यांचा व्यवसाय किंवा उत्पन्नाचे स्त्रोत काय, याची माहिती दिलेली नाही. तरीही त्यांच्या नावे मुंबई, रायगड येथे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मार्मिक मासिक व सामना वृत्तपत्र हे ठाकरे कुटुंबीयांचे आहेत. कोरोना काळात त्यांना कोट्यवधी रुपयांचा नफा झाला. त्याचवेळी अन्य वृत्तपत्र हे आर्थिक संकटातून जात होते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
वृत्तपत्राला झालेला नफा हा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. त्यांनी याचा तपास केला नाही. माझ्या तक्रारीचे उत्तरही आर्थिक गुन्हे शाखेने दिले नाही. परिणामी न्यायालयानेच ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशा मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या याचिकेला ठाकरे कुटुंबीयांकडून विरोध करण्यात आला. अॅड. अस्पी चिनाॅय व अॅड. अशोक मुंदरगी यांनी ठाकरे कुटुंबीयांकडून युक्तिवाद केला. अॅड. चिनाॅय म्हणाले, निव्वळ वृत्तपत्राच्या नफाच्या आधारे संपत्तीवर आक्षेप घेता येऊ शकत नाही. अॅड. मुंदरगी म्हणाले, न्यायालयाचे दार ठोठावण्याआधी तक्रार करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. कोणतीही तक्रार पोलिसांत करता येते. पोलीस तपास समाधानकारक नसल्यास महानगर दंडाधिकारी न्यायालयात खाजगी तक्रार करण्याचा पर्याय असतो. दंडाधिकारी न्यायालय पोलिसांना सविस्तर तपासाचे आदेश देऊ शकते. तो तपासही समाधानकारक नसेल तर उच्च न्यायालयात याचिका करता येते.
याचिकाकर्त्यांनी पोलीत तक्रार केल्यानंतर थेट उच्च न्यायालयात याचिका केली. त्यामुळे या याचिकेवर थेट आदेश देता येणार नाहीत, असा युक्तिवाद अॅड. मुंदरगी यांनी केला. न्यायालयाने पोलिसांनी दिलेल्या माहितीची नोंद करुन घेत या याचिकेवरील निकाल राखून ठेवला.