‘अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष’; राहुल नार्वेकरांचा निकाल
![Rahul Narvekar said that the Ajit Pawar group is the original nationalist](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ajit-Pawar-4-780x470.jpg)
मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्द्यावर आपण पहिला निकाल देणार आणि त्यानंतर आपण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देणार, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. राहुल नार्वेकरांनी अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार मोठा धक्का बसला आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, ३० जून रोजी अजित पवारांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शरद पवार गटाने या प्रक्रियेला विरोध केला. त्यातून राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याचं ३० जून रोजूच स्पष्ट झालं. ३० जून २०२३ रोजी अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. मात्र, शरद पवार गटाने हा दावा फेटाळला आहे. अजित पवारांची निवडणूक पक्षघटनेच्या विरोधी आहे असा दावा शरद पवार गटाने केला आहे.
हेही वाचा – मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय? छगन भुजबळांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत २८ सदस्य आहेत. पण पक्षघटनेनुसार २५ सदस्यच असू शकतात. राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार गटाला बहुमताचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला होता. पण त्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे हा दावा मान्य करता येणार नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटानं या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटांचं संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. अजित पवार गटाकडे मतांचा असलेला पाठिंबाही जास्त असल्याच्या स्थितीला शरद पवार गटाकडून आव्हान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निष्कर्षावर मी आलो आहे, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला.