राहुल गांधी तोंडावर पडले!
आयोगाने सर्व संबंधितांना झापले : 'ईव्हीएम' मध्ये घोटाळा नाही, विरोधकांकडून 'हात दाखवून अवलक्षण' !
मुंबई / नवी दिल्ली : निवडणूक आयोग हा भाजपाला मते चोरण्यास मदत करतो, भाजपाच्या इशाऱ्यावर चालतो आणि चुकीच्या पद्धतीने भाजपाला विजयी करण्यात निवडणूक आयोगाचा हात असतो, असे वारंवार आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना निवडणूक आयोगाने चपराक दिली असून आरसा दाखवत त्यांचे त्यांना तोंडावर पाडले आहे.
हा सूर्य आणि हा जयद्रथ..
गेले अनेक दिवस बेछूट आरोप सहन केलेल्या निवडणूक आयोगाने अचानक पुढाकार घेऊन ईव्हीएम मशीन कसे बरोबर आहे, त्यात फेरफार किंवा छेडछाड होऊ शकत नाही, हे सिद्ध करून दाखवले आहे. आयोगावर आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांचे थोबाड त्यामुळे फुटले असून आता बिन पुराव्याचे आरोप करणे त्यांनी बंद करावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.
आयोगाने काय केले ?
निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शी असल्याचे पटवून देण्यासाठी देशासमोर ४८ बॅलेट युनिट्स, ३१ कंट्रोल युनिट्स, ३१ व्हीव्हीपॅट्स ची सखोल तपासणी केली. दहा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या तक्रारीवर आधारित मशीन तपासल्या गेल्या. शंभर टक्के निष्कलंक आणि अचूक निकाल आले.
कुठेही ‘ब्रेकिंग न्यूज’ नाही..
निवडणूक आयोगाने एवढी मोठी कामगिरी बजावून आरोप करणाऱ्यांना पटवून दिले, त्यांचा खोटारडेपणाचा बुरखा फाडला. पण, कोणत्याच ‘ब्रेकिंग न्यूज’ चॅनेलने त्यावर एक शब्दही उच्चारला नाही, काँग्रेसला जाब विचारला नाही, याबद्दल निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
राहुल गांधी पुन्हा मोकळे..
निवडणूक आयोगाने एवढे सारे खटाटोप करूनही त्यावर उलट किंवा सुलट प्रतिक्रिया देण्यासाठी कोणीही विरोधक पुढे आलेला नाही. निवडणूक यंत्रणांवर संशय घेणारे राहुल गांधी मात्र परत पुन्हा ‘लोकशाही मरत आहे ‘चे गाणे गायला मोकळे झाले असल्याची उपासात्मक प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून उमटली आहे.
राहुल यांचे खवखवते रडगाणे..
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर संशय घेतला, यंत्रणांवर आरोप लावले, लोकशाही व्यवस्थेवरच आक्षेप पण घेतला. त्यांचे हे वागणे केवळ एका पराभवग्रस्त पक्षाचे खवखवते रडगाणे नाही, तर देशाच्या संविधानात्मक रचनेवर थेट हल्ला आहे. निवडणूक आयोग म्हणजे देशाची निवडणूकसंपन्नता टिकवणारी सर्वोच्च संस्था. त्यावर संशय घेणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे आहे, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. राहुल गांधींची ही भूमिका देशविरोधीही आहे आणि संविधानविरोधी देखील आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हेही वाचा – ‘तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
काँग्रेसच्या तक्रारींची दखल..
निवडणूक आयोगाने काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत १० विधानसभा मतदारसंघात तपासणी केली आणि त्यात काँग्रेसचे खरे रूप दिसून आले. त्यांच्या खोटारडेपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
मतदान प्रक्रियेची सखोल तपासणी..
दि. १७ जून 2025 रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दहा मतदारसंघात विशेष ईव्हीएम तपासणी मोहीम जाहीर केली. काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेला बदनाम करण्याचा अट्टहास धरला होता. म्हणून आयोगाने संपूर्ण यंत्रणा तपासली. अगदी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट स्लिप्स यांचे एकत्रित परीक्षण केले. पण त्या सर्वांची शेवटची टॅली अचूक आली, असून त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा छेडछाड दिसून आलेली नाही.
तपासलेली एकूण यंत्रणा..
निवडणूक आयोगाने एकूण ४८ बॅलेट युनिट्स, ३१ कंट्रोल युनिट्स, ३१ व्हीव्हीपॅट्स मशीन तपासली. त्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ, सात जिल्हे, दहा काँग्रेस उमेदवार यांची सविस्तर माहिती आणि झालेले मतदान तपासले. त्यात कोणताही गैरप्रकार आढळून आलेला नाही.
संबंधित अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र..
जे संशय काँग्रेसच्या नेत्यांनी घेतले होते, त्या सर्व शंकांवर भारताची सर्वोच्च इलेक्ट्रॉनिक संस्था असलेल्या ई सी आय एल च्या अभियंत्यांनी अधिकृत प्रमाणपत्र दिले. त्यांनी म्हटले आहे, की सर्व मशीन तपासण्यात आल्या असून, कुठेही कोणताही दोष नाही.’ त्यांच्या या प्रमाणपत्रामुळे आक्षेप घेणारेच आता वाटा शोधून पळू लागले आहेत.
कशातही तफावत नाही, १०० टक्के अचूक
व्हीव्हीपॅट स्लिप्स आणि कंट्रोल युनिट मधील मतांची जुळवणी पूर्णतः शंभर टक्के जुळली. कोणतीच तफावत आढळून आलेली नाही. त्यानंतर आयोगाने म्हटले आहे, की मशीन योग्य आहेत, अभियंते म्हणतात दोष नाही, मतांच्या स्लिप्स शंभर टक्के जुळतात आणि असे होऊन देखील सर्वोच्च न्यायालयातून काँग्रेस पक्ष पळ काढतो.
देशात भ्रम पसरवण्याचा धंदा..
तरीही राहुल गांधी आणि त्यांचे प्रवक्ते अजूनही “लोकशाही संपली” म्हणत देशात भ्रम पसरवत आहे. हा केवळ पराभव झाकण्याचा प्रयत्न नाही. हा देशातील निवडणूक व्यवस्थेवर, संविधानावर आणि जनतेच्या निर्णयावर थेट आघात आहे, असे राजकीय विश्लेषक आणि घटनातज्ज्ञांनी मत नोंदविले आहे.
प्रादेशिक माध्यमांचे मौन..
भाजपाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, प्रादेशिक माध्यमांचे मौन हे राहुल गांधींची आणि काँग्रेसची गुलामगिरी करण्याचा हिमनग आहे. माध्यमांना प्रश्न एवढाच आहे, जेव्हा आयोग राहुल गांधींना अधिकृत पत्र लिहितो, तेव्हा ती ब्रेकींग न्यूज ठरते ? जेव्हा राहुल गांधी ट्विट करतात तेव्हा ती ब्रेकींग न्यूज ठरते, जेव्हा आयोग तपासणी करून अहवाल देतो, जेव्हा निवडणूक आयोग स्वतः म्हणतो की ईव्हीएम ठीक आहेत, तपासणी पूर्ण झालेली आहे. तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज का ठरत नाही ?
निवडणूक आयोगाचे आव्हान..!
ईव्हीएम मशीन खोटे निकाल देते हे सिद्ध करण्याचे किंवा त्यात काही छेडछाड केली जाऊ शकते हे देखील कोणीही स्पष्ट करून दाखवावे असे आव्हान पूर्वी निवडणूक आयोगाने दिले होते. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आणि आप पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हे आव्हान स्वीकारले होते, त्यासाठी मुदतही मागवून घेतली होती. त्यांनी जगातील अनेक तज्ज्ञांची सल्ला मसलतही केली पण शेवटी हाराकिरी पत्करून त्यांनी गप्प बसणे मान्य केले, याची आठवण निवडणूक आयोगाने करून दिली आहे.




