राहुल गांधींच्या मागणीनुसार महाराष्ट्र, हरयाणाच्या मतदार याद्यांचा देणार डेटा
निवडणूक आयोगाच मतदार याद्या देण्यासाठीचं पहिलं पाऊल

मुंबई : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र, हरयाणासह दिल्ली अन् इतर ठिकाणी पार पडलेल्या विधानसभा निवडणुका कशा फिक्स करण्यात आल्या होत्या, याची काही आकडेवारी देऊन आरोप केले होते. यामुळं देशभरात यावरुन चर्चा सुरु झाली. स्वतंत्र संविधानिक संस्था असलेल्या भारतीय निवडणूक आयोगावर त्यामुळं पक्षपातीपणाचे आरोप होऊ लागले.
यापार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या मागणीनुसार तसंच काँग्रेसनं दाखल केलेल्या याचिकेला अनुसरुन महाराष्ट्र आणि हरयाणा या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचं मान्य केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसंच आणखी काही मागणीही केली आहे.
हेही वाचा – राज्य सरकार लवकरच ‘सीएसआर बोर्ड’ तयार करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राहुल गांधींनी नवा सवाल केला आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, निवडणूक आयोगानं मतदार याद्या देण्यासाठीचं पहिलं पाऊल टाकलं आहे. पण निवडणूक आयोग हे जाहीर करेल का की, कुठल्या तारखेपासूनचा डिजिटल आणि मशिन रिडेबल फॉरमॅटमधला हा डेटा आयोग शेअर करणार आहे.
२०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित हेराफेरीबद्दल राहुल गांधी यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या लेखानंतर त्यांनी पुन्हा ही टिप्पणी केली आहे. यात त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने जिंकलेल्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडल्या नाहीत असा दावा केला होता. यावर जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रविवारी म्हटलं होतं की लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यानं उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.
काँग्रेससोबत काम केलेले किशोर यांनी राहुल गांधींच्या दाव्यांचा गांभीर्यानं विचार करण्यावर भर दिला. “राहुल गांधी यांनी त्यांचं मत केवळ एखाद्या तोंडी प्रतिक्रियेतून व्यक्त केलेलें नाही तर लेखी स्वरूपात, वृत्तपत्रातील लेखातून व्यक्त केलेलं आहे,” असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.