खंडोबाच्या ऐतिहासिक तलवारीला ‘मेघडंबरी’त स्थान द्यावे : प्रा. लक्ष्मण हाके
राज्य सरकारकडे मागणी : दसऱ्यानिमित्त मल्हारगड येथे सोहळा

पुरंदर | विजयकुमार हरिश्चंद्रे। मल्हारी मार्तंड (खंडोबा) देवाच्या दसऱ्यानिमित्त मल्हारगड येथे आयोजित धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने ऐतिहासिक खंड्याचे दर्शन घेण्यात आले. यावेळी खंडोबा देवाची तलवार हाती घेत, ती पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहावी यासाठी तलवारीला ‘मेघडंबरी’त ठेवून ‘राज्य मार्तंड शस्त्र’ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी ओबीसी संघर्ष योद्धे लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे केली.
या तलवारीचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा असून, ती केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची असल्याचे हाके यांनी सांगितले. “दुर्जन प्रवृत्तींविरोधात लढण्याची प्रेरणा या तलवारीतून मिळते. ही तलवार आमच्या संघर्षाची आणि अस्मितेची खूण आहे,” असे ते म्हणाले.
सोहळ्यानंतर पारंपरिक ‘तळी भंडारा’ विधी पार पडला. यावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला बळ मिळावे, या उद्देशाने भंडाऱ्याची उधळण करत विशेष प्रार्थना करण्यात आली. “खंडोबाच्या चरणी जातपात, धर्मभेद विसरले जातात. तसाच एकतेचा आणि हक्काच्या लढ्याचा भंडारा आम्ही आज अर्पण केला,” असे अॅड. मंगेश ससाणे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके

या कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र बरकडे, शिवानंद हैबत पुरे महाराज, समीर मारकर, नवनाथ पडळकर, संतोष खोमणे, सचिन मोरे, गणेश कुंभार, बापू लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध जिल्ह्यांतून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढा…
श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीने पीआरओ गोडसे आणि महेश शिंदे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. देवस्थानचे इतर पदाधिकारी अनुपस्थित होते. गुरव पुजारी वीर कोळी घडशी व सेवेकरी वर्गाच्या वतीने हाके आणि ससाणे यांचा धार्मिक सन्मान करण्यात आला. याचे पौरहित्य वैभव दीडभाई गुरुजी यांनी केले. कार्यक्रमात ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी संघटित लढ्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या तलवारीचे पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली योग्य जतन व्हावे, तसेच ती समाजप्रबोधन आणि इतिहास अभ्यासासाठी वापरण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.




