मिशन- PCMC : राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) कडून शहरात ‘‘जुन्या कढीला नव्याने उकळी’’!
किरकोळ प्रवेशाचे ‘‘फार्स’’ दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड शहरातील एकेकाळी सत्ताधारी आणि बलाढ्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर आता किरकोळ प्रवेशांचे ‘फार्स’ करण्याची वेळ आली आहे. किंबहूना, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे आणि अनंत कोऱ्हाळे यांचे प्रवेश घेतले आणि काहीतरी ‘ॲक्टिव्हीटी’ सुरू आहेत, असा दिखावा करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना, महापालिका आणि शहराच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले शहराध्यक्ष योगेश बहल यांनी अक्षरश: ‘‘जुन्या कढीला नव्याने उकळी’’ देण्याची भूमिका घेतली.
महायुतीमध्ये भाजपा सोबत घरोबा असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ‘‘स्वबळाचा नारा’’ दिला. स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवा… असे आदेश अजितदादांनी दिले. त्यानंतर शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आपली यंत्रणा कामाला लावली.
पहिल्या झटक्यात आपल्या प्रभगातील सहकारी व माजी नगसेवक जितेंद्र ननावरे यांची ‘घरवापरी’ केली. त्यानंतर चिंचवडमधील माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांचा प्रवेश घेण्यात आला. सदरचे दोन्ही प्रवेश पुण्यात उरकण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी निवडणूक होईल, असे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपाने निवडणूक प्रमुख, प्रभारी अशी नियुक्ती करुन कामाला सुरूवात केली आहे. किंबहुना, आरक्षण सोडत झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील जाहीर प्रवेशांचा कार्यक्रम जोरदारपणे घेण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजपाला तोडीस तोड आव्हान देण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रवादीकडे नियोजनाचा पूर्णत: अभाव आणि उदासिनता दिसून येत आहे.
ननावरे यांच्या प्रवेशाने आमदार बनसोडे यांची नाराजी?
भाजपाकडून तिकीट न मिळालेल्या उमेदवारांच्या भरोशावर राष्ट्रवादीची मदार आहे. किंबहुना, आढावा बैठका किंवा नियोजनाचा अभाव प्रचंड आहे. पिंपरी विधानसभा निवडणुकीत जितेंद्र ननावरे यांनी आमदार आण्णा बनसोडे यांच्या विरोधात काम केले आहे. बनसोडे यांच्या पराभवाची शपथ त्यांनी सार्वजनिकरित्या घेतली होती. तत्पूर्वी, 2017 मध्ये भाजपात प्रवेश केला आणि स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा हटवली होती. विशेष म्हणजे, योगेश बहल यांच्यावरही टीका केली होती. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार उभा होते. त्यावेळी पार्थ पवार यांच्याविरोधात जाहीर प्रचार केला होता. शहराध्यक्ष बहल यांनी ननावरे यांचा प्रवेश करुन घेणे म्हणजे ‘‘स्वत:चा प्रभाग सुरक्षित करण्यासाठी पक्ष बंडखोरांच्या दावणीला बांधणे’’ असा प्रकार आहे, अशी टीका पक्षांतर्गत होवू लागली आहे. विशेष म्हणजे, ननावरे यांच्या प्रवेशामुळे आमदार बनसोडे समर्थकांत नाराजी आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
अनंत कोऱ्हाळेंमुळे खरंच राष्ट्रवादी ला फायदा होईल का?
माजी मंत्री स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांचे निकटवर्ती तत्कालीन काँग्रेसचे शहराध्यक्ष हनुमंत गावडे यांचे 1997 मध्ये अनंत कोऱ्हाळे समर्थक होते. त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मनसेत प्रवेश केला. 2012 च्या निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकीटावर निवडून आले. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेकडून चिंचवड विधानसभा लढवली. या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात ‘डिपॉझिट जप्त’ झाले. त्यांचा सुमारे 1 लाख 20 हजार मतांनी पराभव झाला होता. 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. शिवसेना फुटली. त्यानंतर कोऱ्हाळे यांनी शिवसेना उबाठा सोबत राहणे पसंत केले. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उबाठा गटात असताना तत्कालीन अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा जाहीर प्रचार केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब भोईर यांचा जाहीर प्रचार केला. भोईर यांना संपूर्ण विधानसभा मतदार संघातून अवघी 4 हजार मते पडली होती. कोऱ्हाळे ज्या प्रभागातून प्रतिनिधीत्व करतात त्या ठिकाणी भोईर यांना 1 हजारपेक्षा कमी मते पडली आहेत. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोऱ्हाळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. या जाहीर प्रवेशाच्यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि अजित गव्हाणे उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादीतील मंडळी ‘‘चिंचवडमध्ये खिंडार’’ असे वातावरण निर्माण करीत आहेत. खरंच अनंत कोऱ्हाळे यांचा राष्ट्रवादीला फायदा होईल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.






