‘इंडिया आघाडीला २४० ते २६० जागा मिळतील, केंद्रात सत्ताबदल होणार’; पृथ्वीराज चव्हाण
अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. या टप्प्यांच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा दावा केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विविध राज्यांमधून आढावा घेतल्यानंतर भाजपला पुन्हा सत्ता मिळणे अवघड असल्याचे दिसत आहे. देश आणि राज्यात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. परिणामी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला सध्या बहुमताचा २७२ चा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे.
देशात जी परिस्थिती आहे, तीच स्थिती महाराष्ट्रातही आहे. महाराष्ट्रात महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या तीन-चार जागा निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसला १२ जागांवर यश मिळू शकते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागांवर विजय मिळू शकतो.
हेही वाचा – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू, होर्डिंग हटवण्याचं काम सुरूच
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती होती. त्यामुळे या दोघांनी सहा टक्के मते घेतली. परंतु, यंदा एमआयएमची साथ नसल्याने वंचितला पूर्वीइतकी मतं मिळणार नाहीत. तर देशपातळीवर इंडिया आघाडीलाही चांगले यश मिळेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. इंडिया आघाडीला देशभरात साधारण २४० ते २६० जागा मिळतील. याउलट २०१९ च्या तुलनेत एकाही राज्यात भाजपच्या जागा वाढतील, असे दिसत नाही. ‘अबकी बार चारसो पार’ ही स्वत:चीच घोषणा पंतप्रधान मोदींच्या अंगलट आल्याची टिप्पणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत आहे. या मुद्द्यांवर मोदी आणि भाजपला स्पष्टीकरण देता आलेले नाही. भाजपकडून २०४७ सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र, त्याविषयी भाजपकडे स्पष्टता किंवा कोणतेही ठोस धोरण नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.





