लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी सुरू; सर्व मतदारसंघांचा घेण्यात आला आढावा
![Preparations for Lok Sabha elections begin; All the constituencies were reviewed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Loksabha-Election-2024-1-780x470.jpg)
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण एक जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुका-2024 मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने राज्याचा दौरा केला. या पथकामध्ये भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन. एन. बुटोलिया, सचिव सौम्यजित घोष, सचिव सुमनकुमार दास यांचा समावेश होता. या पथकाने सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
हेही वाचा – ‘मंत्रालयाचे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल’; बच्चू कडू यांचं विधान
या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांचे सादरीकरण आयोगासमोर केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.