‘पंतप्रधान मोदी संरपंच झाले की काय?’ शिर्डी दौऱ्यावरून प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
![Prakash Ambedkar said whether Prime Minister Narendra Modi has become Sarpanch](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Prakash-Ambedkar-and-Narendra-Modi--780x470.jpg)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान, यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी सरपंच झाले की काय? असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ग्रामपंचायत सरपंच झाले म्हटल्यानंतर काय बोलणार? एखाद्या गावात कुठेही काहीही झालं तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे. म्हणूनच मी म्हणतोय की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून आता सरपंच झाले आहेत.
हेही वाचा – ‘गुणरत्न सदावर्ते यांना संपवलं पाहिजे होतं’; शिंदे गटातील नेत्याचं खळबळजनक विधान
भाजपा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेतो. मात्र त्यांच्याच कार्यकाळात मागील एक वर्षात जवळपास १ लाख १३ हजार हिंदूंनी देश सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. त्यातील एकाने आपलं मनोगत व्यक्त करत भाजपा आम्हाला आमच्या विचाराने चालू देत नसल्याचं आणि भाजपा आम्हाला त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. आमच्या वाड-वडिलांनी जी अब्रू कमावली ती भाजपाकडून धुळीस मिळवली जाते आहे म्हणून आम्ही देश सोडत आहोत, असं म्हटलं आहे. मुस्लिम किंवा ख्रिश्चन बांधवांनी देश सोडला असता तर एकवेळ मी समजू शकतो. मात्र भाजपाच्या राज्यात हिंदू देश सोडून जात आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्हीही खोटारडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत का? ते स्वतः ओबीसी असल्याचा प्रचार सध्या करत आहेत जो खोटा आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. सध्याचे राजकारण बघतात आता नरेंद्र मोदी बापात बाप ठेवणार नाही आणि लेकात लेक ठेवणार नसल्याने आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याच्या तयारीला लागलो आहोत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.