‘२०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत’; प्रकाश आंबेडकरांचा दावा
मुस्लिम समाज कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाही
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते मुंबईत मुस्लीम मौलवी आणि उलमा यांच्याबरोबरच्या बैठकीत बोलत होते.
मुस्लीम समुदायाने साथ दिली तर २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाही. तुम्ही हे लिहून ठेवा. ही मुस्लिमांची ताकद आहे. यावेळी बदलाची लाट मुस्लिमांमधून येईल. २०२४ मध्ये मुस्लिम समाज कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाही हा सर्वांना विश्वास आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
देशात धार्मिक तेढ वाढवणारी तसेच सामाजिक शांतता भंग करणारी परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम मौलवी आणि उलमा यांच्या सोबत काल महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ‘मुस्लिम समाजाची सध्याच्या राजकिय व्यवस्थेतील पिळवणूक, मूलभूत समस्या आणि संविधानिक उपाय’ या अनुषंगाने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच पैगंबर बिल संदर्भात देखील चर्चा झाली, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलं आहे.