‘सकाळी कुणाबरोबर शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणाबरोबर..’; गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना टोला

अजित पवारांनी आम्हाला या गोष्टी सांगण्याची गरज नाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांची भविष्यवाणी केली. उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडलेला एकही नेता पुन्हा निवडून येणार नाही, अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवारांनी जे वक्तव्य केलं आहे, ते कितपत लागू होतं, हे त्यांनीच तपासून बघावं. हे सकाळी कुणाबरोबर शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणाबरोबर जातात. तिसऱ्या दिवशी कुणाबरोबर सरकारमध्ये बसतात. अशांनी आम्हाला या गोष्टी सांगण्याची गरज नाही, असा टोला गुलाबरान पाटील यांनी अजित पवारांना लगावला.
दरम्यान, जे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडले आहेत. त्यातील एकही आमदार निवडून येत नाही. नारायण राणेंनी शिवसेना फोडली होती. सगळे बाहेर पडले. त्यानंतर राणेसाहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. मुंबईत तर त्यांना एका महिलेनं पाडलं. एका बाईनं पाडलं, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली होती.





