‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याआधी राष्ट्रपतीपदासाठी मला विचारणा’; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
![Prakash Ambedkar said that he will ask me for the presidency before President Draupadi Murmu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Prakash-Ambedkar-3-780x470.jpg)
मुंबई | प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नुकताच महाविकास आघाडीत सामील झाला आहे. या युतीनंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याआधी राष्ट्रपतीपदासाठी मला विचारण्यात आले होते, असे ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्याआधी भाजपाने या पदासाठी माझ्याकडे विचारणा केली होती. तुम्ही लवकरच वयाचे ७० वर्षे पूर्ण करणार आहात. त्यामुळे तुम्हाला आता राष्ट्रपती व्हायला आवडेल का? असे मला भाजपाने विचारले होते. तर मी त्यांना माझ्याकडून अजूनही १० वर्षे शिल्लक आहेत, असे सांगितले होते. मला तुम्ही राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात का? २०२४ मध्ये सर्व पक्षांनी चांगली कामगिरी केली तर चित्र वेगळे असू शकते. मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या, असेही मी त्यांना म्हणालो होतो.
हेही वाचा – काँग्रेसकडून राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर!
भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य असून, याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांना ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असही प्रकाश आंबेडकर म्हणाले.