Pimpri-Chinchwad: ‘जॅकवेल’ प्रकरणाच्या वादात राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची ‘शिष्टाई’
जॅकवेलच्या निविदेला तात्काळ मंजुरी द्या : आक्षेपांबाबत शहानिशा करुन लेखी खुलासा करण्याची प्रशासनाला मागणी
![Pimpri-Chinchwad: NCP MLA Anna Bansode's 'courtesy' in 'Jackwell' case controversy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/MLA-Anna-Bansode-Pimpri-Chinchwad-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करुन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी उचलण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी धरणात जॅकवेल उभारण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली आहे. मात्र, त्याबाबत काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. याबाबत शहानिशा करुन तात्काळ प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे.
याबाबत आमदार बनसोडे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाणी संदर्भात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया राबवली पाहिजे. निविदा प्रक्रियेतील सहभागी कंपनींच्या ‘हिस्टरी रेकॉर्ड’बाबत काही आक्षेप आहेत. असे प्रसारमाध्यमांमधून समजले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने नि:पक्षपणे चौकशी करणे अपेक्षीत आहे. तसेच, कायदा विषयक सल्ला घेवून संबंधित निविदा प्रक्रिया तात्काळ राबवली पाहिजे.
निविदा प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीमध्ये निरपेक्ष प्रणालीनुसार राबवली जावी. संबंधित प्रक्रियेवर घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत प्रशासनाने खुलासा करावा. सत्य-असत्य याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला लेखी स्वरुपात वस्तुस्थिती कळवावी, अशी सूचना आहे. तसेच, निविदा प्रक्रिया सदोष असेल, तर त्वरीत रद्द करावी आणि नियमानुसार योग्य असेल, तर तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करावी आणि कामाला सुरूवात करावी. कारण, हा पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याचा प्रश्न आहे. या मुद्यावर कोणत्याही परिस्थितीत राजकारण होता कामा नये, अशी आमची ठाम भूमिका आहे, असेही आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे.
राजकीय दबावाला बळी पडू नका : बनसोडे
तसेच, निविदा प्रक्रिया पूर्ण करीत असताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना वस्तुस्थितीचे अवलोकन करावे. ज्यामुळे कोणताही समज-गैरसमज राहणार नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराला अतिरिक्त १५६ एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. व्यापक जनहिताचा विचार करुन प्रशासनाने सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही करावी. कोणत्याही राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विचार करुन शहरातील नागरिकांना वेठीस धरू नये, अशी आग्रही मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/भामा-आसखेड-प्रकल्पातील-जॅकवेलच्या-निविदेची-शहानिशा-करणेबाबत_page-0001-724x1024.jpg)