अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी
मॅक्सिको, कॅनडा या देशातून येणाऱ्या सामानावर 25 टक्के आणि चीनमधून आयात होणाऱ्या सामनावर 10 टक्के शुल्क
![new,elect,president,donald trump,tariff,order,signature, Mexico, Canada, China, Imports, Duties,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/trump-3-780x470.jpg)
अमेरिका : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारात सातत्याने जे बोलत होते, त्याची अमलबजावणी त्यांनी सुरु केली आहे. आधी बेकायदरित्या अमेरिकेत राहणाऱ्या घुसखोरांवर त्यांनी कारवाई सुरु केली. त्यांना विमानात भरुन देशाबाहेर काढलं. त्यानंतर टॅरिफ लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. मॅक्सिको, कॅनडा या देशातून येणाऱ्या सामानावर 25 टक्के आणि चीनमधून आयात होणाऱ्या सामनावर 10 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. यामुळे नवीन ट्रेड वॉर सुरु होऊ शकतं. त्यामुळे वर्षाला 2.1 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यापार बाधित होऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढीच समर्थन करण्यासाठी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पॉवर्स ACT अंतर्गत नॅशनल इमर्जन्सीची घोषणा केली आहे. या कायद्यातंर्गत संकटातून बाहेर निघण्यासाठी मोठे अधिकार वापरण्याची परवानगी यामध्ये मिळते. ट्रम्प यांच्या आदेशानुसार संशोधित टॅरिफ कलेक्शन मंगळवारी 12.01 मिनिटांनी सुरु होईल.
हेही वाचा – १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? बजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत
निर्णयामागे काय स्पष्टीकरण दिलं?
“अमेरिकेत बेकायदरित्या राहणारे परदेशी नागरिक आणि फेंटेनाइलसह घातक ड्रग्समुळे आमच्या नागरिकांच्या जीविताला धोका असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं. अमेरिकन नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. राष्ट्रपती या नात्याने सर्वांची सुरक्षा निश्चित करणं माझं कर्तव्य आहे” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हटलं.
जागतिक व्यापार युद्धाची सुरुवात
व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितलं की, “कॅनडामधून येणाऱ्या ऊर्जा उत्पादनांवर केवळ 10 टक्के शुल्क लागेल. पण मॅक्सिकोमधून होणाऱ्या ऊर्जा आयातीवर 25 टक्के शुल्क आकारलं जाईल” डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्णय घेऊन नव्या जागतिक व्यापार युद्धाची सुरुवात केली आहे. अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र, पूर्वीच गतवैभव मिळवून देण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा संकल्प आहे. अमेरिका फर्स्ट हे त्यांचं धोरण आहे.
ट्रम्प यांचं गणित काय?
अन्य देश अमेरिकेचा फायदा उचलतात. पण त्या तुलनेत अमेरिकेला लाभ मिळत नाही. जगात अमेरिकेन मालाची मागणी वाढली पाहिजे. निर्यात वाढली, तर अर्थव्यवस्था अजून सूदृढ होईल असे ट्रम्प यांचे विचार आहेत. म्हणून त्यांनी निवडणूक प्रचारातच आयात शुल्क वाढवण्याचा इशारा दिला होता. कारण असं केल्यास देशांतर्गत बनणाऱ्या उत्पादनाची मागणी वाढेल असं ट्रम्प यांचं गणित आहे.