नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
![Nehru Killed Mahatma Gandhi's Thoughts: Former Minister of State Sadabhau Khot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Sadabhau-Khot-780x470.jpg)
- युवा संसद २०२३ मध्ये आयडिया ऑफ इंडिया या विषयावर सत्र
पुणे : आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावी झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे, परंतु महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे स्विकारावेच लागेल, अशी टीका राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे संस्थेच्या नऱ्हे कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडिया या सत्रामध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता पार्थ पटले, कुणाल दंडवते आदी यावेळी उपस्थित होते. रंजना गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्कार, संजय गिराम यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार तर राजेश पाडवी यांना आदर्श आमदार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
सदाभाऊ खोत म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला, परंतु इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, भारतामध्ये पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतील. पंडित नेहरू यांना दिल्लीतील रायसोनी हिल्स हाच भाग भारत वाटत होता. परंतु नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात विकासाची पाळेमुळे नेऊन पोहचवले खऱ्या अर्थाने आज भारताचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला दिसत आहे.
बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले – सदाभाऊ खोत
सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत. परंतु हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत . कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले. यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.