‘सत्ताधाऱ्यांना निकालाची चाहूल लागली, मंत्रालयात लगबग सुरू’; नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य
जुन्या फायली पटापट काढल्या जात आहेत
![Nana Patole said that it is going on in the Ministry](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/nana-patole-1-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर संपली आहे. आता न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. मात्र, निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे सांगता येत नाही. याच दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक महत्वाचे विधान केलं आहे. सरकार जात असताना जशी मंत्रालयात हालचाल सुरू असतात तशीच हालचाल सध्या मंत्रालयात पाहायला मिळत आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक ही शेवटची आहे की नाही हे सांगता येणार नाही. कारण जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही. तोपर्यंत त्यावर काही बोलणं योग्य नाही. पण आमचे लोक जे सांगत आहेत ते महत्वाचे आहे. मंत्रालयात लगबग वाढली आहे. जुन्या फायली पटापट काढल्या जात आहेत, असं आमचे लोक सांगत आहेत. कदाचित सत्ताधाऱ्यांना काही चाहूल लागली असावी. त्यामुळे मंत्रालयात लगबग सुरू असल्याचा सीन आहे. याचा अर्थ काही ना काही गडबड आहे, असं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
सरकार जेव्हा जातं तेव्हा अशीच लगबग असते. मंत्रालयातील गडबडीवरून मला असं वाटतं. काही तरी गडबड आहे असं निश्चित दिसतं. पण कोर्टाचा निकाल येईपर्यंत मी त्यावर काही भाष्य करणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर काय करणार? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर आमचे ए आणि बी प्लॅन ठरले आहेत. आम्ही निकालाची वाट पाहत आहोत, असंही नाना पटोले म्हणाले.