‘मराठा विरूद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपाला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
![Nana Patole said that BJP wants to make Manipur of Maharashtra by creating controversy between OBCs and Marathas.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Nana-Patole-780x470.jpg)
मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
नाना पटोले म्हणाले, भाजपाला जातनिहाय गणना करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचे नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा केली जात आहे. ओबीसींना मराठ्यांविरुद्ध भडकवण्याचा भाजपाचा हा प्रकार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपाला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे. पण, दोन्ही समाजातील जनतेने संयम बाळगावा, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा – राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. भाजपची २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता आली, पण आरक्षण काही दिले नाही. उलट त्यांनी तत्कालीन महाधिवक्ता कुंभकोणी यांना मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशाप्रकारचा युक्तिवाद करण्याची सूचना केली. फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देऊन २०१४ मध्ये खड्डे खोदले. आता ते त्याच खड्ड्यात पुरले जाणार आहेत, असं नाना पटोले म्हणाले.
वास्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता जातनिहाय गणनेशिवाय पर्याय नाही. परंतु, भाजपा त्याविरोधात आहे. आम्ही सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करू, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकू आणि कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असंही नाना पटोले म्हणाले.