ताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

नागपूर जिल्ह्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला

नागपूर आणि रामटेक या दोन्ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेच्या

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान केल्यानंतर तब्बल एक महिना १४ दिवसांनी मतमोजणी होत असल्याने निवडणुकीत कोण जिंकणार, याची मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून कळमना बाजार समितीत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

नागपूर जिल्ह्यातील नागपूर व रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत झाली. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री व भाजप उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस उमेदवार व आमदार विकास ठाकरे यांच्यात तर रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत झाली. गडकरींमुळे नागपूरच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे तर रामटेकची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नागपूर जिल्ह्यातील असल्याने या दोन्ही जागी महायुतीची विशेषत: भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काँग्रेसच्या मागे शक्ती उभी केली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. परंपरेप्रमाणे दोन्ही जागा महायुतीकडे जातात की महाविकास आघाडी परिवर्तन घडवते याची सध्या चर्चा आहे.

प्रशासनाची सज्जता
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी कळमना बाजार समितीमध्ये होणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था सज्ज केली आहे. मतमोजणीसाठी एकूण सहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जाणार आहे. बाजार समितीच्या आत आणि बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागपूर आणि रामटेकसाठी दोन स्वतंत्र ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी १२० याप्रमाणे २४० टेबल लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरुममधून प्रथम ईव्हीएम मतमोजणीस्थळी आणले जाणार असून त्यानंतर टपाल मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्या २२ ते २६ फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती
केंद्रीय निवडणूक आयोगाने नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी तीन मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. रामटेक मतदारसंघातील उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी फैयाज अहमद मुमताज यांची तर काटोल, सावनेर आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघासाठी महेश कुमार दास यांची नियुक्ती करण्यात आली. नागपूर लोकसभा मतदारसंघात दक्षिण पश्चिम, दक्षिण व नागपूर पूर्व या तीन विधानसभा मतदारसंघासाठी विपुल बंसल तर मध्य, पश्चिम आणि उत्तर नागपूरसाठी राजीव रंजन सिन्हा यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी संदर्भात तक्रार असल्यास निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button