छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान!
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
![Municipal Grant for Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary Programme](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/PCMC-1-780x470.jpg)
मौजे वढू बु. ग्रामस्थांनी मानले आभार, एकूण २.९९ लाखांचा निधी
पिंपरी : वढू बु. येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळी छत्रपतींचा पुण्यतिथी कार्यक्रम होतो. या ठिकाणी राज्यातील शिव-शंभूप्रेमी भेट देत असतात. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने २. ९९ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका मागणी केली होती. प्रतिवर्षी फाल्गून अमावस्येला संभाजी महाराजांचा बलिदान दिन अर्थात पुण्यतिथीनिमित्त आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध व्हावा. यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
दरम्यान, महापालिका स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत याबाबत प्रस्ताव तयार करुन त्याला मंजुरी देण्यात आली होती. भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी याबाबत सभागृहात आग्रही पुढाकार घेतला होता.
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करताना सोयी- सुविधा उपलब्ध करण्याबाबत निधीअभावी अडचणी येतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायतला प्रतिवर्षी मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनीही केली होती. त्यामुळे पुण्यतिथीदिनी समाधी स्थळाच्या ठिकाणी मंडप व लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, हार-फुले इत्यादी करिता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रतिवर्षी देण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते वढु बु. ग्रामस्थांना यावर्षीचा २.९९ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी विठ्ठल जोशी, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी व्यक्त केले आभार…
पुण्यतिथी दिनी वढू बु. येथे सुमारे दीड लाख शिवप्रेमी येत असतात. त्यांना जेवण, मंडप, स्वच्छतागृह, लाईट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी कमी पडतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरवर्षी आम्हाला निधी उपलब्ध करुन देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. याबाबत आमदार महेश लांडगे आणि महापालिका प्रशासनाचे आम्ही आभार मानतो, अशा भावना मौजे वढू बु. च्या सरपंच सारिका शिवले यांनी व्यक्त केल्या.
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ मौजे वढू बु. येथे प्रतिवर्षी पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना केली होती. यावर्षीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. याबाबत महापालिका प्रशासनाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. समाधी स्थळी सोयी-सुविधा आणि पावित्र्य जपण्याकामी कायम पुढाकार घेण्याची आमची भूमिका आहे.
महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.