राज्यातील महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच शक्य, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे
![Municipal elections in the state are possible only after the monsoons, the hearing in the Supreme Court continues](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Election-1-780x470.jpg)
कोल्हापूर : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी २८ मार्चपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतर होतील, असा अंदाज आहे. कोरोना, ओबीसी आरक्षण, सदस्य संख्या तसेच प्रभाग संख्या अशा विविध कारणांमुळे कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सुमारे चारवेळा पुढे गेली आहे. शेवटच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपुष्टात आली आहे.
सत्तांतरानंतर शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा वाढीव सदस्यांचा निर्णय रद्दबातल करत पूर्वीप्रमाणेच प्रभाग संख्या निश्चित केली होती. याविरोधात तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात महत्त्वाच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार असल्यामुळे महापालिका निवडणुकांविषयी सुनावणी होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता पावसाळ्यानंतरच होईल,अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.