मुंबईत कोणालाही महापौर बसवणं सोपं नाही; खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut | मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे शिवसेना युतीला मोठं यश मिळाल्यानंतर आता महापौरपदासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी महापौरपदाच्या घडामोडींवर मोठं भाष्य केलं आहे. मुंबईतील आकडेवारी पाहता कोणालाही महापौर बसवणं सोपं नाही, असं स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, मुंबईत शिंदे सेनेचा महापौर होणार नाही, कारण रविवारी आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणाले की, पहिल्यांदा मुंबईत भाजपाचा महापौर होणार वैगेरे, म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत महापौरपदी कोणाला बसवायचं. गौतम अदाणी देखील ठरवतील की महापौरपदी कोणाला बसवायचं. मात्र, एक सांगतो की मुंबईच्या जनतेने दिलेली आकडेवारी पाहता मुंबईत कोणालाही महापौर बसवणं सोपं नाही.
हेही वाचा : पुणे ग्रँड चॅलेंज टूर : पिंपरी-चिंचवडमधील स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ज्या प्रकारे मुंबईकरांनी आकडे निवडून दिलेले आहेत आणि भाजपा कितीही विजय उत्सव साजरा करत असलं तरी भाजपाचा विजय झालेला नाही. मोदींनी देखील स्वत:च्या भाषणाचं आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदी म्हणतात की काँग्रेसचा जिथं जन्म झाला तिथे आम्ही काँग्रेसचा पराभव केला. मात्र, मोदींना राजकीय इतिहासाचं भान नाही. मुंबईत गेले किमान २५ वर्ष शिवसेनेचं (ठाकरे) राज्य आहे. त्यामुळे मोदींचं भाषण लिहिणाऱ्या लोकांचं इतिहास कच्च आहे, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपावर केली.
महापौर पदाच्या शर्यतीत शिवसेना ठाकरे आहे का? की विरोधी पक्षात बसवण्याचं ठरवलं आहे? या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही अद्याप काहीही ठरवलेलं नाही. आम्ही आता फक्त मजा पाहत आहोत. कोणी पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. माझ्या माहिती प्रमाणे भाजपाच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. कोण कोणाला घाबरतंय? त्यांचंच सरकार आहे. मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईतील नगरसेवकांकडे लक्ष ठेवत आहेत, म्हणजे मला तर गंमत वाटते, असंही राऊत म्हणाले.




