प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ‘हॅपी क्लासरूम’ विषयावर शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण

मोशी | प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे “हॅपी क्लासरूम” या विषयावर शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. आनंदी, सकारात्मक व तणावमुक्त शिक्षण वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रशिक्षणासाठी सुप्रसिद्ध प्रशिक्षक मा. शिल्पा गुजारे आणि मा. मनीषा काळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा आनंद, भावनिक स्वास्थ्य आणि वर्गातील सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी वापरता येणाऱ्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींवर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.
शिक्षक–विद्यार्थी नातेसंबंध सकारात्मक ठेवण्याचे महत्त्व, सहानुभूती व सर्जनशीलतेच्या माध्यमातून प्रभावी वर्गव्यवस्थापन कसे करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संवादात्मक सत्रे, विविध उपक्रम तसेच प्रत्यक्ष वर्गातील उदाहरणांमुळे हे प्रशिक्षण अधिक प्रभावी व उपयुक्त ठरले.
हेही वाचा : पुणे ग्रँड चॅलेंज टूर : पिंपरी-चिंचवडमधील स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत मानसिक आरोग्य, सजगता (माइंडफुलनेस) आणि सकारात्मक प्रोत्साहन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले अनुभव शेअर केले, त्यामुळे सत्रे अधिक समृद्ध झाली.
आनंदी व समावेशक वर्ग वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गुणवत्ता वाढते तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, हे प्रशिक्षणातून स्पष्ट झाले. शाळा व्यवस्थापनाने प्रशिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक करून प्रशिक्षणात शिकवलेल्या पद्धती प्रत्यक्ष अध्यापनात अमलात आणण्याचे आवाहन केले.
अशा उपक्रमांमधून प्रियदर्शनी स्कूलची सर्वांगीण शिक्षणप्रणाली व शिक्षक सक्षमीकरणाप्रतीची बांधिलकी दिसून येते. हा कार्यक्रम आनंदी व सकारात्मक वर्गनिर्मितीसाठी नव्या उत्साहाने संपन्न झाला.




