नरेंद्र मोदी पूर्वजन्मात छ.शिवाजी महाराज होते; भाजप खासदाराचं लोकसभेत वक्तव्य

Pradeep Purohit | भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदी पूर्वजन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते, असं वक्तव्य ओडिशातील बारगढ येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी लोकसभेत केले आहे. भाजपा खासदारांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.
लोकसभेत बोलताना भाजप खासदार प्रदीप पुरोहित म्हणाले, की ते एका साधूला भेटले होते. त्या साधूने त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. पंतप्रधान मोदी हे खरे तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.
हेही वाचा : दंगली कशाला करताय? मोहन भागवतांसह सरकारने जाऊन कबर उद्धस्त करावी; संजय राऊतांची टीका
प्रदीप पुरोहित यांच्या या विधानाला काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी विरोध केला आहे. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्याचा विचार करावा, अशी विनंतीही केली. तर, दिलीप सैकिया यांनी प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्याची चौकशी करून ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.