‘मोदींचीच शिवसेना खरी असे..’; ठाकरे गटाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल!
![Modi's own Shiv Sena will not hesitate to speak the truth](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/narendra-modi-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
मुंबई : नांदेड, नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रूग्नालयांत मोठ्या संख्येने रूग्णमृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्र सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
मुख्यमंत्री महोदयांचे बूड महाराष्ट्रात टिकत नाही व ते सतत दिल्लीस पळत आहेत. पालकमंत्री कुणाला नेमायचे, महामंडळांचे वाटप कसे करायचे, असे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री ऊठसूट दिल्ली वाऱ्या करतात. स्वाभिमानासाठी पक्षत्याग करणाऱ्यांचे हे असे हाल सुरू आहेत. दिल्लीने ‘ऊठ’ म्हटले की उठायचे व ‘बस’ म्हटले की बसायचे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पायजम्याची नाडी दिल्लीच्या हातात आहे. त्यामुळे शिवसेना या महाराष्ट्र अभिमानी पक्षाचे नाव त्यांना धुळीस मिळविले आहे. आता फक्त ‘मोदी मोदी-शहा शहा’चा गजर सुरू आहे. उद्या ते शिवसेनेची स्थापना मोदींमुळे झाली, मोदींचीच शिवसेना खरी असे बोलायलाही कमी करणार नाहीत. भाजपने शिवसेनेशी उभा दावा मांडला व त्यासाठी शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांना हाताशी धरले ते यासाठीच.
हेही वाचा – राष्ट्रवादीबाबत सुनावणी संपली; वाचा दोन्ही गटांचा युक्तीवाद..
अजित पवार त्यांच्या गटाच्या खुशामतखोरीत खूश आहेत. शिंदे त्यांचा गट सांभाळत बसले आहेत. देवेंद्रभाऊ या दोघांना नाचवीत, त्यांचे डमरू वाजवीत आहेत व महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान चालले आहे. महाराष्ट्राची सुखचैन, शांतता अधोगतीस गेली आहे. सोन्यासारखे राज्य खचून गेलेले दिसत आहे. पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते असे एकदा दादा धर्माधिकारी म्हणाले होते. महाराष्ट्राच्या बाबतीत ते खरे ठरले आहे.
राज्यात तणावाच्या स्थितीत ना मुख्यमंत्री जागेवर आहेत ना दोन उपमुख्यमंत्री. लंडनवरून वाघनखे येतील, पण दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचे सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसले आहेत, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.