कॉंग्रेसच्या घोषणापत्राबाबत मोदी खोटे बोलत आहेत; मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/mahaenews-6-780x470.jpg)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची दिशाभूल करण्यासाठी कॉंग्रेसच्या घोषणापत्राबाबत चुकीची माहिती देत आहेत असा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. हरियाणातील आपल्या पहिल्या प्रचारसभेत ते बोलत होते. कॉंग्रेस संपत्तीचे फेरवितरण आणि महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेण्याची योजना तयार करत असल्याचा मोदी यांचा दावा साफ खोटा असल्याचेही खर्गे यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसची सत्ता आली तर तुमची संपत्ती हिरावून घेतली जाईल, तुमचे मंगळसूत्र, सोने- चांदी ते घेतील व इतर लोकांना देतील असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. जर तुमच्याकडे दोन एकर जमीन असेल तर त्यातली एक एकर ते काढून दुसऱ्याला देतील. तुमच्याकडे दोन म्हशी असतील तर एक म्हैस मुसलमानाला देतील असेही मोदींनी म्हटले आहे. मात्र हे मोदी यांनी म्हटले आहे, आम्ही नाही असे खर्गे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – भाजप किती जागा जिंकणार? अमेरिकेच्या राजकीय तज्ज्ञाने केली मोठी भविष्यवाणी
ते पुढे म्हणाले की जर पंतप्रधानच असे बोलत असतील तर आम्ही काय करू शकतो? अशा लोकांना तुम्ही मत दिले पाहिजे का? अंबाला येथील प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की कॉंग्रेसचे सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना केली जाईल जी लोकांच्या हिताची असेल. कोणाची संपत्ती हिरावून घेण्यासाठी ते केले जाणार नाही. कॉंग्रेस पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संच्याा विचारधारेशी लढतो आहे.
ते लोक संविधान हिसकावून घेत आहेत आणि आम्ही त्या विरोधात लढतो आहोत. त्यांना लोकशाही संपवायची आहे आणि आमचा लढा त्याच्या विरोधात आहे. त्यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये देण्याची घोषणा केली, २ कोटी रोजगार देण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. मात्र तुम्हाला हे मिळाले का? एक पंतप्रधान असे खोटे कसे बोल शकतात असा सवाल खर्गे यांनी विचारला.