आमदार जितेंद्र आव्हाड यांची भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया
आव्हाडांनी करुन दिली जुनी आठवण,पवार साहेबांना सर्वाधिक त्रास भुजबळांनीच...
![MLA, Jitendra Awad, Bhujbal, angry, reaction, Remember, Pawar, sir, trouble,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/bujbal-and-avad-780x470.jpg)
महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता छगन भुजबळांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यामुळे ते लवकरच बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यातच आता छगन भुजबळ पुढील दोन दिवस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन याबद्दल चर्चा करणार आहेत. त्यातच आता छगन भुजबळांचे जुने सहकारी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ नाराज असल्याचे कळताच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी अनेक जुन्या गोष्टी नमूद केल्या आहेत. तसेच छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने कशाप्रकारे मान-सन्मानाने वागणूक दिली, याबद्दलही त्यांनी भाष्य केले. छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय पवार साहेब स्वतः उभे रहायचे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
आज छगन भुजबळ साहेबांकडे बघताना एक विचार नक्कीच माझ्या मनात आला. ज्या दिवसापासून आदरणीय शरद पवार साहेबांसोबत छगन भुजबळ साहेब आले ; त्या दिवसापासून आदरणीय साहेबांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. भुजबळ साहेबांचा मानसन्मान हा पहिल्यांदा राखला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ, पहिले उपमुख्यमंत्री छगन भुजबळ !
छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय पवार साहेब स्वतः उभे रहायचे. १९८५ -९० च्या काळात पवार साहेबांना सर्वाधिक त्रास भुजबळांनीच दिला होता. हा सगळा राजकीय प्रवास बघितल्यावर भुजबळांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रात कोणाच्याही मनात शंका नसेल. आदरणीय साहेबांनी भुजबळांवर जेवढे प्रेम केले तेवढे कदाचित बाळा साहेबांनंतर कुणीही केले नसेल. मला माहित नाही का, पण राहून राहून वाटतेय की, आदरणीय शरद पवार साहेबांसारखा कार्यकर्त्यांना जपणारा नेता आजतरी महाराष्ट्रात नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.