Mission PCMC : रणसंग्राम होणार… चार सदस्यीय प्रभागपद्धतीवर शिक्कामोर्तब!
‘‘महाईन्यूज’’चे वृत्त तंतोतंत खरे : पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर होणार ‘काँटे की टक्कर’

पिंपरी-चिंचवड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकानं दिले आहेत. चार आठवड्यांपूर्वीच ‘महाईन्यूज’ने चार सदस्यीय प्रभाग पद्धती होईल, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. (Mission PCMC)
राज्यात अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत.

राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
BMC Elections Ward Formation : मुंबईमध्ये एकसदस्यीय प्रभाग
महाराष्ट्रातील महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.
मुंबईमध्ये आधी 227 प्रभाग होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं होतं. पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये 227 प्रभाग असणार आहेत.
अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग महानगरपालिका – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली
ड वर्ग महापालिकांमध्ये तीन ते पाच सदस्य
ड वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना शक्यतोवर सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत. मात्र, सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा 5 सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग 3 सदस्यांचे होतील. ड वर्ग महापालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.
Mission PCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये काँटे की टक्कर…!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, भाजपा महायुतीमध्ये एकवाक्यता नाही. किंबहुना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटाची ताकद भाजपापेक्षा कमी आहे, असा दावा भाजपाकडून केला जातो. तसेच, भाजपासोबत आपण सुरक्षीत नाही, असा होरा राष्ट्रवादीतील काही मंडळींनी अजित पवार यांच्याकडे लावून धरला आहे. परिणामी, महापालिका निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची कसोटी लागणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांना पक्षाचे अस्थित्व टिकवण्यासाठी झगडावे लागणार आहे.
प्रभाग पद्धतीबाबत राज्य सरकारचा जीआर (GR) : 202506101937058625