मंत्री धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार, करुणा शर्माचा खळबळजनक दावा
आता त्यांच्यासमोर काहीही राहिलेले नाही. त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल

बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार आहे, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. 3-3-2025 ला राजीनामा होणार, असे करुणा शर्मा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच झालेला आहे, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला आहे.
उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलची मोठा खुलासा केला आहे. मला १०० टक्के याबद्दलची माहिती मिळालेली आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवस आधीच घेतला गेला आहे. वाल्मिक कराड जर दोषी असेल तर मी स्वत: राजीनामा देईन, असे सांगितले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर काहीही राहिलेले नाही. त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांनी घेतला आहे. ते अजून जाहीर का झालेले नाही, याबद्दलची माहिती नाही. पण काल एसआयटी, सीआयडी चौकशीचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे १०० टक्के उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !
धनंजय मुंडेंकडे बोलण्यासारखे काहीही राहिलेले नाही
मला १०० टक्के असं वाटतंय की अधिवेशनाआधी अजित पवार स्वत: राजीनामाबद्दलची घोषणा करतील. अजित पवार हे पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती देतील. आता धनंजय मुंडेंकडे बोलण्यासारखे काहीही राहिलेले नाही. वाल्मिक कराड हा त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती आहे. आपण त्याला त्यांची सावली असं म्हणू शकतो. त्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंच्या पोटाचे पाणी हलत नाही. त्यामुळे ही १०० टक्के खरी गोष्ट आहे, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
वाल्मिक कराड हे आका, त्यांची खूप मोठी टोळी
धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की कोणीही दोषी असेल तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड जेव्हा सरेंडर झाला तेव्हा संतोष देशमुख हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी, असे म्हटले होते. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येमुळे लोकांच्या मनात खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडकडून लोकांना गुंड प्रवृत्तीत परिवर्तन करायचं काम सुरु होतं. जे १० लोक आहेत, त्यात वाल्मिक कराड जे आका आहेत, त्यांचं वय हे जास्त आहे. बाकी सर्वजण २६, २७ अशा तरुण वयातील मुलं आहेत. यांची खूप मोठी टोळी आहे, असेही करुणा शर्मा यांनी सांगितले.
हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु
माझं धनंजय मुंडेंसोबत काहीही बोलणं झालं नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जनतेने जे आक्रमक रुप घेतलेलं आहे. पण तरीही राजीनामा व्हायला नको, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पण मला देवेंद्र भाऊंवर पूर्ण विश्वास आहे. याप्रकरणाची चौकशी इतक्या चांगल्या पद्धतीने सुरु आहे. एसआयटी, सीबीआय यांना चौकशीत चांगले यश मिळालेले आहे. वाल्मिक कराड हा जो खरा आका होता, पुण्यातील एका डॉनलाही अटक झाली. त्यामुळे देवेंद्र भाऊंचे खूप चांगले काम सुरु आहे. यासाठी मी त्यांची कौतुक करते, असेही करुणा शर्मा यांनी म्हटले.