‘१० फेब्रुवारीला बैठक आणि उपोषण सुरु’; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
![Manoj Jarange Patil said that the meeting and fast will start on February 10](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Manoj-Jarange-Patil-3-780x470.jpg)
मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. येत्या काही दिवसांत आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांमध्ये बैठकसत्र सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील काही १०-२० जणं सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सलग बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं असं ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाहीये. हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलतायत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन.
हेही वाचा – आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत. माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाहीत तोपर्यंत मी बाजूला हटत नाही. श्रेयासाठी हे विनाकारण मध्ये घुसायला लागले आहेत. मराठा समाजाचेही काही जळणारे नेते आहेत. सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
हे ठरलेले १५-२० जण आहेत. मराठ्यांच्या जिवावर खाणारे आहेत ते. गरीब घरातला मुलगा मराठ्यांसाठी लढतोय ही यांची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. हा मॅनेजही होत नाही, फुटतही नाही आपलं काय होणार? असा प्रश्न त्यांना पडलाय. मी १० तारखेला या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषण करणार आहे. जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. मी कुठेही बसलो, तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतीत दुसरं काही करायचं असतं, तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो. लोकांमध्ये कशाला आलो असतो? असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.