पंतप्रधान मोदींना आता मराठ्यांची गरज नाही का? मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल
![Manoj Jarange Patil said that Prime Minister Modi does not need Marathas anymore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/manoj-jarange-patil-5-780x470.jpg)
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मद्दा सध्या चांगलाच तापला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल शिर्डी दौऱ्यावर आले होते. मात्र त्यांनी याबाबत एकही शब्द काढला नाही. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरीबांची जाण आहे असं वाटत होतं. पण ते मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाही. मोदींकडून आम्हाला खूपच आशा होती. पण, शेवटची आशाही कामाला आली नाही. त्यामुळे मोदींबद्दल असणारा गैरसमज आमच्या मनातून निघून गेला आहे. त्यांना मराठा समाजाची गरज राहिली नाही.
हेही वाचा – शरद पवारांबद्दल मोदींनी केलेल्या ‘त्या’ विधानावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाल्या..
आता मराठे लढायला सज्ज झाले आहेत. आता आम्ही लढूनच आरक्षण मिळवू. आम्ही कुठल्याही पुढाऱ्यांना गावबंदी घातली नाही. आम्ही एवढंच म्हणालो, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय तुम्ही आमच्या गावात यायचं नाही. आम्हाला बाकी आरक्षणाच्या भानगडीत पाडायचं नाही, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि विषय संपवा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाज हक्काच्या आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करीत आहे. पण, काही लोक त्यांच्या विरोधात विद्वेष पसरविण्याचे काम करीत आहे. मुंबईत गाड्या फोडल्याची घटना मला ठावूक नाही. अशा घटनांचं मी समर्थन करत नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.