‘७० वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं, पण..’; मनोज जरांगे पाटीलांचं मोठं विधान
![Manoj Jarange Patil said that no one has given reservation for 70 years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Manoj-Jarange-Patil-1-5-780x470.jpg)
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे. जरांगे पाटील यांची आज सांगलीच्या विट्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी सत्तर वर्षे ओबीसी नेत्यांचा सरकारवर दबाव होता. पुरावे लपवून ठेवण्यात आले होते, असा गंभीर आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई एकजुटीमुळे अंतिम टप्प्यात आली आहे. सत्तर वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं. पण, जेव्हा समिती स्थापन झाल्या आणि दस्तावेज शोधण्याचं काम झालं, तेव्हा मराठ्यांचे पुरावे नसल्याचं सांगितलं गेलं. सत्तर वर्षे ओबीसी नेत्यांचा सरकारवर दबाव होता. पुरावे लपवून ठेवण्यात आले होते.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना शरद पवारांचा टोला; म्हणाले..
प्रत्येकवेळी पुरावे नसल्याने मराठ्यांना आरक्षण देता येत नाही, असं सांगितलं जायचं. मात्र, घराघरातील मराठा एकत्र आला आणि न्यायासाठी लढा सुरू केला. ही एकजूट पाहून सरकारनं पुरावे शोधण्यास सुरूवात केली. आता प्रत्येक जिल्ह्यात लाखांमध्ये मराठ्यांच्या नोंदी आढळल्या आहेत. मग, १८०५ ते १९६७ आणि १९६७ ते २०२३ पर्यंत आढळलेल्या पुराव्याच्या आधारे ७० वर्षापूर्वी आरक्षण दिलं, असतं तर मराठा ही जगात प्रगत जात राहिली असती. आम्हाला दाबून मारण्याचा प्रयत्न कुणी केला? आमच्याकडे पुरावे असतानाही ७० वर्षे आरक्षण कुणी दिलं नाही? आरक्षण असताना आमच्या जागा हडप करण्यात आल्या, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.