‘मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर..’; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल
![Manoj Jarange Patil said that if something bad happens to Manoj Jarange's life, Maharashtra will not burn](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/manoj-jarange-patil-and-narendra-modi-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास महाराष्ट्र पेटेल, असा इशारा दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, सरकारला किती वेळ हवा आहे असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे. त्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत आहेत का? सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना जरूर भेटावं, हा सरकारचा अधिकार आहे. सरकारने जरांगेंशी चर्चा करावी. आमची भूमिका स्पष्ट आहे की, अदिवासी, ओबीसी किंवा इतर समाज अशा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी. हे कारणं केंद्र सरकारच्याच हातात आहे.
हेही वाचा – विराट विक्रम रचण्यास सज्ज! आज वानखेडे स्टेडियमवर रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना
मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंतले आहेत. अमित शाह छत्तीसगडपासून मिझोरामपर्यंत फिरत आहेत आणि महाराष्ट्र पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात लोक आत्महत्या करत आहेत. मनोज जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सरकारला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? त्यासाठीच हे सर्व चालू आहे का? पंतप्रधान मोदींनी किमान दुरध्वनीवरून मनोज जरांगेंशी बोलले तरी पाहिजे. तेही बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही का? मोदी एक-एक तास मन की बात करतात, जगभरात फिरतात, जगभरातील नेत्यांना मिठ्या मारतात, पण महाराष्ट्राच्या सुपुत्राने आपला जीव पणाला लावलाय त्याच्याशी बोलायला वेळ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? त्यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे ना? त्यांनी जरांगे पाटलांचे प्राण वाचवावेत, असंही संजय राऊत म्हणाले.