‘छगन भुजबळांना भाजपाकडून ऑफर..’; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा
![Manoj Jarange Patil said that Chhagan Bhujbal has an offer from BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Chhagan-Bhujbal-and-Manoj-Jarange-Patil-2-780x470.jpg)
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना भाजपाकडून ऑफर असल्याचा दावा केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझं मराठा समाजाला आव्हान आहे की शांततेत राहा. कारण आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. बहुतेक त्यांना सरकारनेच पाठबळ दिलं असावं. नाहीतर त्यांना भाजपाकडून काहीतरी ऑफर आली असेल. किंवा भाजपाने त्यांना पाठबळ दिलं असेल. कारण गृहमंत्री यावर काही बोलत नाहीत. गृहमंत्री त्यांना (भुजबळांना) थांबवत नाहीत. आरक्षण देतो सांगून मराठा समाजाला त्रास देण्यासाठी पलटी मारायचं ठरलंय की काय अशी शंका येत आहे.
हेही वाचा – ‘मणिपूरला जायला वेळ नाही, सामना बघायला आहे’; प्रियंका गांधींची मोदींवर खोचक टीका
आम्ही जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्यं केलेली नाहीत. ज्यांनी केली त्यांना अडवायचं होतं. आम्ही त्यांना उत्तर दिलं. घरात कुणी काही बोललं तर दुसरा माणूस विचारतोच की असं का बोललास बाबा? तसंच आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही आता २४ डिसेंबर पेक्षा जास्त वेळ सरकारला देणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या समाजाला मी विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. २४ तारखेनंतर काय करायचं तो निर्णय मी त्यांनाच विचारुन घेणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.