‘जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, आम्ही ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. या निवडणुका महायुती एकत्रच लढणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना माहिती देताना बावनकुळे म्हणाले, जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांना स्थानिक स्तरावर महायुती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर ५ ते १० टक्के जागांवर काही अडचणी येऊ शकतात. मात्र त्या ठिकाणी फडणवीस आणि शिंदे चर्चा करून अंतिम निर्णय घेतील.
हेही वाचा – ‘सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची’; आ. विजय वडेट्टीवार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही महायुती सज्ज आहे. शिवसेनेने ९० ते १०० जागांची मागणी केली असली तरी, जागावाटपाचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून लघेतला जाईल. यासाठी भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार पदाधिकारी चर्चा करतील आणि मतभेद झाल्यास वरिष्ठ नेते तोडगा काढतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच, मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून घेतील.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचाच भाग असून आगामी निवडणुकीत ते महायुतीबरोबरच असतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले होते, मनभेद नव्हते. मात्र ते आता पूर्णपणे दूर झाले आहेत, असे बावनकुळे यांनी नमूद केले.





