कुदळवाडी बुलडोझर प्रकरण : शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हरवले आहेत का?
मुस्लिम समाजाच्या नेत्या रुहिनाज शेख यांचे ‘चॅलेंज’ : खासदारांना शोधून देईल त्याचा करणार सत्कार!
![Kudalwadi-Bulldozer-Case-Is-Shirur-MP-Amol-Kolhe-missing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Kudalwadi-Bulldozer-Case-Is-Shirur-MP-Amol-Kolhe-missing-1-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
चिखली-कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि भंगार व्यावसायिकांच्या दुकानांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण कारवाई सुरू केली. त्याला या भागातील व्यापारी आणि मुस्लिम बांधवांनी विरोध केला. मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले. अखेर प्रशासनाला सदर कारवाई थांबवावी लागली.
कुदळवाडी-चिखली भागातील भंगार दुकानांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांच्या पाश्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. याबाबत भाजपाचे हिंदूत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा सभागृहात कारवाईची मागणी केली होती. या भागात बांगलादेशी आणि रोहिग्यांचे बेकादेशीर वास्तव्य असल्याचा दावा केला होता. त्यामुळे प्रशासनाने कारवाई तीव्र केली.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने अनधिकृत मालमत्ताधारक आणि बेकायदा भंगार व्यावसायिकांना कारवाई करण्याबाबत नोटीस दिली. त्यानंतर गुरूवारी मोठ्या फौजफाट्यासह कारवाई सुरू केली. मात्र, मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला आणि प्रशासनाला कारवाई स्थगीत करावी लागली.
मुस्लिम समाजाच्या नेत्या रुहिनाज शेख यांनी विशिष्ट समाजाला ‘टार्गेट’ करण्यासाठी केलेल्या या कारवाईवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन शेख यांनी आंदोलन उभा केले. त्याला यश मिळाले आणि व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
आमदार लांडगेंमुळे कुदळवाडी तील कारवाईला धार्मिक रंग…
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी बांगलादेशी आणि रोहिग्यांचा मुद्दा उपस्थित करीत कुदळवाडी-चिखली परिसरातील अतिक्रमण कारवाईला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक, तशी परिस्थिती नाही. सदर बांधकामे नियमित करता येतील. पण, लांडगे यांना ही कारवाई करुन आपण एका विशिष्ट समाजाला ‘टार्गेट’ करीत आहोत, असे चित्र उभा करायचे आहे. कारण, त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये या भागातून मतदान कमी झालेले आहे. मात्र, ही कारवाई केवळ मुस्लिम बांधवांवर नाही, तर सर्वच धर्मीयांच्या बांधकामांवर होणार आहे. सदर कारवाई अन्यायकारक आहे, अशी भूमिका रुहिनाज शेख यांनी ‘महाईन्यूज’शी बोलताना व्यक्त केली.
खासदार कोल्हे, अजित गव्हाणे फिरकले नाहीत…
कुदळवाडी- चिखली भागातील नागरिकांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केले. मध्यंतरी आगीची घटना झाल्यानंतर अतिक्रमण कारवाई झाली. त्यावेळी डॉ. कोल्हे प्रत्यक्ष भेट देणार होते. आता गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू आहे. पण, डॉ. कोल्हे नागरिकांनी मागणी करुनही या ठिकाणी फिरकले नाहीत. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांना आमच्या लोकांनी मतदान केले. ही नेते मंडळी पुरोगामी विचाराच्या बढाया मारतात. पण, आता त्यांना कारवाई दिसत नाही का? असा प्रश्न आहे. ‘‘खासदार कोल्हे साहेब कुठेतरी हरवले आहे. शोधणाऱ्याला योग्य तो सन्मान देण्यात येईल..’’ अशी टीकाही रुहिनाज शेख यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे केली आहे.