बाप सांभाळता येत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळेल? शिंदे गटातील आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या (२३ एप्रिल) जळगाव दैऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. यावरून शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
किशोर पाटील म्हणाले की, माझ्यावर संस्कार असल्याने उद्धव ठाकरेंचं स्वागत करत आहे. पण, साडेतीन वर्षांपूर्वी आर. ओ पाटील यांचं निधन झालं. ते पाचोरा मतदारसंघाचे १० वर्षे आमदार होते. मात्र, आर, ओ पाटील यांना कॅन्सरचं निदान झाल्यावर बॉम्बे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रूग्णालयात असताना उद्धव ठाकरेंना आर. ओ पाटील आठवण काढत असल्याची सातत्याने माहिती दिली. परंतु याची साधी दखलही मातोश्रीवरून घेण्यात आली नाही.
ज्या कालपर्यंत सर्वांना शिव्या घालत होत्या की, माझ्या वडिलांच्या निधनानंतर साधी विचारपूस करण्यासाठी कोणीही आलं नाही. ती मुलगी जेव्हा ठाकरेंच्या पक्षात जाऊन कट्टर शिवसैनिक समजते. हे माझं दुर्दैव आहे, असं किशोर पाटील म्हणाले.
ठाकरेंच्यात एवढी जादू असती, तर दीडशे पैकी ५६ जागा आल्या नसत्या. जर त्यांच्या सभेमुळेच सर्वजण आमदार झाले असते, तर उद्धव ठाकरेंनी २८८ मतदारसंघात सभा घेतल्या असत्या. महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंच्या भाषणाला त्रस्त झाली आहे. एखाद्या लहान मुलासारखं माझा बाप चोरल्याचं सांगतात. ज्याला बाप सांभाळता येत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळेल? असा टोला किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.





